अहिल्यानगर महानगर पालिकेवर प्रशासक म्हणून कारभार करत असताना अचानक पद्धतीने पाणीपट्टी वाढ केली असून ती अन्यायकारक आहे, जरी ते प्रशासक असले तरी नागरिकांच्या भावना लक्षात घेणे गरजेचे होते पण त्याचा कुठेही विचार केलेला दिसत नाही तरी वाढविलेल्या पाणीपट्टीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.
यावेळी जल अभियंता परिमल निकम, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, सुरेश बनसोडे, बाळासाहेब जगताप, सचिन जगताप, कौशल गायकवाड, सागर गोरे, आकाश दंडवते, ओंकार घोलप आदी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटलंय की, अहिल्यानगर शहरातील नळ धारकांच्या पाणीपट्टी दरात स्थायी समितीच्या माध्यमातून १००टक्के इतकी भरमसाठ वाढ केल्याचे समजते. आम्ही या दरवाढीचा तीव्र विरोध करतो, कारण ही वाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय जाचक आहे.
दरवाढ करताना नागरिकांवर पडणाऱ्या आर्थिक बोजाचा पुरेसा विचार झाल्याचे दिसत नाही. पाणी पुरवठा योजना खर्चिक आहे, हे मान्य असले तरी, नागरिकांवर अतिरक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घेतली जाणे गरजेचे आहे.या पार्शवभूमीवर आपण याचा पुनर्विचार करून पाणीपट्टी दरवाढ मर्यादित ठेवावी,अशी आमची मागणी आहे.
तसेच, शहरातील ज्या भागांमध्ये ३-४ दिवसांनी पाणी पुरवठा होतो किंवा अत्यल्प पाणी मिळते, त्या भागांतील नागरिकांसाठी मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. याशिवाय, मीटरद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्याचे दर वाजवी ठेवावेत, जेणेकरून नागरिकांना अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागणार नाही.तरी या संदर्भात त्वरीत कार्यवाही करून शहरातील नागरिकांच्या पाणी पट्टी दरात केलेली भरसमाट वाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.