अर्बन बँकेच्या संचालक मंडळाविरोधात आरोप करणाऱ्या बँक बचाव पॅनलची निवडणुकीतून माघार

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :-नगर अर्बन बँक निवडणूक प्रक्रियेत बँक बचाव पॅनलच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे.

तत्कालीन संचालक मंडळाविरोधात सातत्याने आरोप करत चौकशी, गुन्हे दाखल होणे, आरबीआयने प्रशासक नेमणे आदी गोष्टी लावून धरत

निवडणुकीत उतरलेल्या राजेंद्र गांधी यांच्या बँक बचाव समितीच्या पॅनलने ऐन वेळी माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विरोधकांनी घेतलेल्या माघारी नंतर सुवेंद्र गांधीच्या नेतृत्वात असलेल्या सहकार पॅनलचे चार संचालक बिनविरोध झाल्याने आनंदाचे वातावरण आहे.

रात्री स्व.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी सुवेंद्र गांधी यांना खांद्यावर घेत उमेदवार, आणि समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

यावेळी बोलताना सुवेंद्र गांधी म्हणाले, स्व.दिलीप गांधींनी आयुष्यभर बँकेसाठी, बँकेच्या उन्नती साठी काम केले आहे. त्यामुळे सभासद आमच्या पाठीशी नेहमी होते.

विरोधकांनी चुकीचे आरोप केले, त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आहे. आता बँक पाच हजार कोटींची करायचे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे.

जनतेला सर्व काही माहीत आहे, त्यामुळे विरोधकांना माघार घ्यावी लागली आहे असे सुवेंद्र गांधी म्हणाले. आमचे चार उमेदवार बिनविरोध झाले आहेत, येत्या दोन-चार दिवसात काही गोष्टी नंतर सर्व पॅनल बिनविरोध असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe