अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- नागवडे कारखान्याच्या अर्कशाळा विभागातील मळीसाठवण टाकीतील तापमान वाढून टाकी फुटल्याने जवळपास ४ हजार मेट्रिक टन मळी वाहून गेली. ही घटना गुरुवारी (१० फेब्रुवारी) पहाटे घडली.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. मात्र, शेतकऱ्यांचा अजून मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करायचा राहीला असल्याने कारखाना बंद करू नये, अशी मागणी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर यांनी केली आहे.
नागवडे साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. कारखाना साखरेबरोबर उपपदार्थ तयार करतो. कारखान्याच्या अर्कशाळा विभागात टाक्यांमध्ये मळी साठवण्यात येते.
गुरुवारी पहाटे अर्कशाळेतील टाकीच्या आतील तापमान वाढल्याने ही टाकी अचानक फुटली. या टाकीची साठवण क्षमता साडेचार हजार मेट्रिक टनाची असून या टाकीत ४ हजार १०० मेट्रिकटन मळी साठवलेले होती.
टाकी फुटल्याने ही हजारो लिटर मळी वाहून गेली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत कारखान्याची संरक्षक भिंत देखील कोसळली.
या दुर्घटनेत कारखान्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, सचिव बापूराव नागवडे, अर्कशाळा विभागप्रमुख बबनराव गोरे, सुरक्षाअधिकारी बाळासाहेब लगड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कारखाना प्रशासनाने उत्पादन शुल्क विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.
मागील अडिच वर्षांपूर्वी ही अश्याच प्रकारे टाकीचा स्फोट झाला होता. त्यावेळी नवीन टाकीसाठी ८० टक्के पैसे दिलेले आहेत. मात्र, ती टाकी आजपर्यंत आलेली नाही. अशी घटना वारंवार घडत असेल, तर जबाबदार असणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केशव मगर यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम