Ahmednagar News : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार शेवगाव तहसील येथे महसूल नायब तहसीलदारपदी असलेले मयूर बेरड यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेचे नायब तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर या पदावर कार्यरत असलेले राजू दिवाण यांची शेवगाव तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सार्वजनिक सेवा हितार्थ आणि प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी अमोल गावडे यांच्या सही-शिक्क्याने हे आदेश जारी झाले आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/04/ahmednagarlive24-Ahmednagar.jpg)
नाशिक महसूल विभागातील चार नायब तहसीलदार यांच्या बदल्या या आदेशाने करण्यात आल्या आहेत. राजू दिवाण हे राज्य शासनाच्या सेवेत महसूल सहाय्यक म्हणून १९९० मध्ये दाखल झाले. पुढे सेवा नियमानुसार त्यांची अव्वल कारकून, नायब तहसीलदार पदी क्रमशः पदोन्नती झाली.
नायब तहसीलदार म्हणून दिवाण यांची प्रथम नियुक्ती पारनेर तहसील कार्यालयात झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गृह शाखेचे नायब तहसीलदार म्हणून ते कार्यरत होते. नव्याने जारी झालेल्या आदेशानुसार दिवाण यांची शेवगाव तहसील कार्यालयातील रिक्त असलेल्या निवासी नायब तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मयूर बेरड यांची महाराष्ट्र राज्यसेबा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वाा नायब तहसीलदारपदी निवड झाली. राज्यसेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात सुरुवातीचे अडीच वर्षे कामकाज पाहिले.
नायब तहसीलदार म्हणून त्यांची प्रथम नियुक्ती शेवगाव तहसीलमध्ये झाली होती. आता दिवाण यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेच्या नायब तहसीलदारपदी मयूर बेरड यांना नियुक्त्त करण्यात आले आहे.