Maharashtra : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र शिंदे गटाच्या नेत्याने सुषमा अंधारे यांच्यावर टीका करत मोठा आरोप केला आहे.
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर सुषमा अंधारे प्रकाशझोतात आल्या. त्यांनतर त्यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. मात्र आता शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी सुषमा अंधारे यांना उरलेली शिवसेना संपवायला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठवले असल्याचा आरोप केला आहे.
दीपक केसरकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, राष्ट्रवादीने ठाकरे गटाला संपवण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. अर्धी शिवसेना संपवली. आता उरलेली संपवायला सुषमा अंधारेंना पाठवले आहे, असा आरोप केसरकरांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीबाबतही त्यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपमध्ये युती होणार आहे. तसेच केसरकरांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर भाष्य करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
दीपक केसरकर म्हणाले, काही लोकांना बोलता येते. काही लोकांना कृती करता येते. ज्यांनी सीमा भागाच्या सुविधा बंद करून ठेवल्या होत्या, त्यांना असे बोलणे शोभत नाही.
आम्ही सुविधा सुरू केल्याच, पण कोर्टातल्या केसलाही गती दिली. सीमाभागचे राजकारण पेटवून राजकारण करणाऱ्यांचा महाराष्ट्राने विचार करण्याची गरज, आहे असेही केसरकर म्हणाले आहेत.