Navneet Rana : राज ठाकरे मुन्नाभाई एमबीबीएस सारखे सुपरहिट, पण उद्धव ठाकरे आधीच फ्लॉप

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल मुंबईमध्ये (Mumbai) बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मात्र त्यांच्या सभेतील मुद्द्यांना आज विरोधकांकडून प्रतिउत्तर येत आहे. नुकतेच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी कालच्या रॅलीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ब्र शब्द काढला नाही. राज्यातील भारनियमावर भाष्य केलं नाही. अडिच वर्ष तर घरातून बाहेरच पडले नाही.

विदर्भातील एकाही गावात अजूनपर्यंत दौरा का केला नाही? कालच्या भाषणात बेरोजगारी दूर करण्याबाबतचं जराही भाष्य केलं नाही. हाताला काम दिलं. फक्त एवढंच त्यांनी सांगितलं. कुठे काम दिलं? या उलट फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी तीनपट रोजगार वाढवले. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात किती रोजगार दिले याचा डेटा तुम्ही काढून पाहू शकता, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

तसेच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा हा शिवसेनेचाच अजेंडा होता. काल संभाजी महाराजांची जयंती होती. मात्र, तुम्ही भाषणात म्हणालात औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर करण्याची गरज काय? तुम्हीच तसं म्हणू शकता.

कारण औरंगाबादचं नाव संभाजी नगर करायला गेल्यास तुमच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला जाईल हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळेच औरंगाबादच्या नामांतराची गरज नसल्याची भाषा तुमच्या तोंडी आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख मुन्नाभाई (Munnabhai MBBS) असा केला होता. शाल अंगावर घेतल्याने कुणी बाळासाहेब होत नसतं, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

या विधानाचा समाचार घेताना नवनीत राणा म्हणाल्या, मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा गाजला होता. संजय दत्तच्या स्वप्नात गांधी येत होते. राज ठाकरेंच्या बाबतीत तसंच झालं. तर मुन्नाभाई एमबीबीएस सारखे राज ठाकरे सुपरहिट होतील. तुम्ही आधीच फ्लॉप आहात. अजून तुमचं डिझास्टर होईल, असा हल्लाबोल नवनीत राणा यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe