Maharashtra news : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वांत उशिरा आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. अपेक्षेप्रमाणे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ते दोघेही आज सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.इतर पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले तरीही राष्ट्रवादीची यादी जाहीर होत नव्हती. राज्यपाल नियुक्त यादी रखडल्याने अन्याय झालेल्या खडसे यांना यात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती.
तसेच विधान परिषदेचे सभापती असलेल्या निंबाळकर यांनाही पुन्हा संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होतीच. मात्र, यादी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने काही बदल होणार का? याकडे लक्ष लागले होते.
इतर पक्षांनी आधीच यादी जाहीर केली आहे. सर्वच पक्षांत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने यावरून नाराजी होणेही अपेक्षित आहे. भाजपने पंकजा मुंडे यांना तर शिवसेनेने मंत्री सुभाष देसाई यांना टाळल्याने त्याची मोठे पडसाद उमटले आहेत. तर काँग्रेसने उदयपूर चिंतन शिबिरात ठराव केल्याप्रमाणे तरुणांना संधी न देता ज्येष्ठांना पुन्हा स्थान दिल्याने त्याची चर्चा आहे.