एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे जैसे थे आहेत. सदरचे प्रश्न सुटत नसल्याने कर्मचारी हतबल झाला आहे. कामगारांना राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा पर्याय निर्माण झाल्याने असंख्य कर्मचारी या संघटनेकडे जात आहेत. एसटी कामगारांसाठी ही नवी संघटना कार्यरत झाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली काढला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजार रुपये वाढ केली. कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर, कार्याध्यक्ष पंकज वालावलकर घेत आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. दररोज नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेना कार्यरत आहे. राष्ट्रीय कर्मचारी सेना ही राज्याच्या विविध विभागांत तसेच आगारांमध्ये सक्रिय झाली आहे.
कित्येक वर्षापासून कर्मचाऱ्यांना काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरुन नाहक त्रास देण्याचा उद्योग सुरु ठेवला आहे. या त्रासाला कंटाळून काही कर्मचारी हतबल झाले आहेत. असे कर्मचारी राष्ट्रीय कर्मचारी सेनेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे.
राज्यात राष्ट्रीय कर्मचारी सेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आम्ही सातत्य ठेवले आहे. कर्मचाऱ्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही. अशी भूमिका आमच्या संघटनेने घेतली आहे. त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही आग्रही राहणार आहे – पंकज वालावलकर,कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कर्मचारी सेना