अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोनाकाळात सगळीकडेच अर्थचक्र गाळात रुतलेले दिसून येत आहे. कामधंदे बंद पडल्याने अनेकांवर आर्थिक कुर्हाड कोसळली आहे.
यातच कोणतेही उत्पन्न स्रोत नसल्याने आर्थिक हाल होत असताना महावितरणकडून वीजबिल वसुली सक्तीने होत आहे.
यामुळे वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वसुली करू नये यासाठी शिर्डीमधील सचिन चौगुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मदन मोकाटे, समीर शेख आदींनी वीज जोड कट करणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली़.
सक्तीची मोहीम घेऊ नये अशी विनंती महावितरणला करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केला आहे.
शिर्डी मध्ये देखील कोरोनामुळे अर्थचक्र बंद पडले आहे. शहरात कोरोनाने अनेक कुटुंबे बाधित झाली होती.
साईबाबांचे मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय, हार-फुले विक्री करणारे, दुकानदार तसेच साईभक्तांवर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यवसाय, साईभक्तांना ने-आण करणारा वाहन व्यवसाय (टुरिस्ट) पूर्णपणे बंद आहे.
शिर्डीत जवळजवळ अघोषित लॉकडाऊनच आहे. त्यामुळे शिर्डीतील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून या कठीण काळात वीज वितरण कंपनीकडून सक्तीने वसुली सुरू आहे. बिल न भरल्यास वीज कनेक्शन कट केले जात आहे.
मंदिर सुरू झाल्यानंतर शिर्डीकर पूर्णपणे वीज बिल भरतील; परंतु आज रोजी सुरू असलेली कारवाई शिथिल करण्यात यावी, अशी मागणी अहमदनगरचे वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सांगळे, उपकार्यकारी अभियंता पाटील, शिर्डी येथील जगताप यांना केली आहे़
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम