अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Politics News :- निवडणुकीच्या निकालाचे अंदाज वर्तविणारे एक्झिट पोल बऱ्याचदा चुकतात. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल काहीसे खरे ठरले आहेत.
मात्र, याच दरम्यान विरोधक आणि सामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जाणार एक अंदाज मात्र चुकीचा ठरला आहे. तो म्हणजे निकालानंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/03/Not-an-exit-poll-this-time-the-prediction-turned-out-to-be-wrong.webp)
निवडणूक संपली, युक्रेन-रशिया युद्धाचे सावट असले तरीही देशात सलग १३६ व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ झाली.
बॅरला भाव आता भाव १०८ डॉलरपर्यंत गेला आहे. तरीही रविवारी आपल्या देशात इंधनाचे दर जैसे थे ठेवण्यात आलेले आहेत. कमॉडिटी बाजारात शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव १.२९ टक्क्यांनी वाढला आणि तो १०७.९ डॉलरवर गेला.
यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १०४.७ डॉलर झाला आहे. त्यात १.७२ टक्के वाढ झाली. अर्थात त्याआधी तीन सत्रांत तेलाचा भाव ५ टक्क्यांनी कमी झाला होता.
ही चढउतार होत असली तरी आपल्याकडील पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर जैसे थे ठेवले आहेत. निवडणुकीनंतर दरवाढ होईल, असे विरोधक जाहीरपणे सांगत होते.
नागरिकही तशी भीती व्यक्त करीत होते. त्यातच युद्धाचा भडका उडाल्याने तर दरवाढ होणारच, असेच सर्वांना वाटू लागले होते.
आता निकाल लागून दहा दिवस झाले आहेत, तरीही इंधनाचे दर जैसे थे राहिल्याने याबाबतीत सर्वांचाच अंदाज चुकला आहे.