सर्वसामान्य ग्राहकांना धक्का देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. आत्तापर्यंत घरगुती विना-अनुदान कनेक्शनधारक हवे तितके सिलिंडर घेऊ शकत होते. आता मात्र केंद्र सरकारने यासाठी कोटा निश्चित केला आहे.
आता नवीन नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त १५ सिलिंडर मिळणार आहेत. तर एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर मिळणार नाहीत. घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी आता रेशनिंगसारखी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

घरगुती विनाअनुदानित रिफिल व्यावसायिकांपेक्षा स्वस्त असल्याने तेथे वापरल्या जात आहेत, अशा तक्रारी आल्याने हा उपाय करण्यात आला आहे. मात्र, त्याचा फटका प्रामाणिक ग्राहकांनाही बसण्याची शक्यता आहे. याच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.
हे बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांना लागू पडणार आहेत. अनुदानित घरगुती गॅससाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त १२ सिलिंडर मिळतील. तसेच यापेक्षा जास्त गरज असल्यास अनुदान नसलेले सिलिंडरच घ्यावे लागतील.