अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- भारतीय संस्कृती मध्ये गंगा नदीचे जल म्हणजे पवित्र जल मानले जाते. अनेक धार्मिक विधी मध्ये या गंगा नदीच्या पवित्र पाण्याला खूप महत्त्व आहे.
परंतु हे जल प्रत्येकाला सहजासहजी आपल्या घरामध्ये उपलब्ध करता येत नाही. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन भारतीय डाक विभागाने श्रावण महिन्यामध्ये खास देशातील सर्व नागरिकांसाठी पवित्र असणारे गंगाजल आता संपूर्ण देशात पोस्टामार्फत उपलब्ध करून दिले आहे.
हे गंगाजल आता देशातील बहुतांश पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असणार आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व श्रीरामपूर येथील प्रधान डाक कार्यालयात आता गंगाजल मिळणार आहे.
तसेच तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सर्व पोस्ट ऑफिस मध्ये देखील याचा पुरवठा करण्यात आलेला आहे. तरी श्रावण महिन्यामध्ये नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एस. रामकृष्णा यांनी केले आहे.
गंगाजल थेट गंगोत्री येथील असून ते उत्तर काशी येथून पॅकिंग करून देशातील विविध भागांमध्ये वितरीत केले जाते. सध्या गंगाजल 250 मिली च्या प्लास्टिक बाटलीमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत फक्त ३० रुपये आहे. अशी माहिती डाक निरीक्षक संदीप हदगल यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम