Maharashtra News:महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असताना तिकडे बिहारमध्ये मात्र राजकीय भूकंप झाला आहे.
महाराष्ट्रात जसे भाजपने सरकार पाडले, तशी खेळी करून मुख्यमंत्री नीतीश कुमार नवा घरोबा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

त्यामुळे भाजपला महाराष्ट्रात दिलासा तर बिहारमध्ये फटका बसला आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत भाजपपासून वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला.
दुपारी चार वाजता नीतीश कुमार व राजदचे नेते तेजस्वी यादव राज्यपालांना भेटणार आहेत. राज्यपालांना भेटून नीतीश कुमार राजीनामा देऊन नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा करू शकतात. मुळे बिहारमध्ये जेडीयू-राजद आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबतचे संबंध ताणले गेल्याचे संकेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सातत्याने देत होते. महाराष्ट्रात जशी शिवसेना आणि भाजपची युती जुनी आहे, तसंच बिहारमध्येही नितीश कुमार यांचा जेडीयू आणि भाजप २० वर्षांपासूनचे सहकारी आहेत.
मात्र या समीकरणामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेकदा बदल झाले, विरोधातले पक्ष बदलत राहिले, मात्र मुख्यमंत्रिपदावर एकच नेता कायम राहिला आणि तो म्हणजे नितीश कुमार.
बिहारच्या राजकारणात चलाखीच्या बाबतीत ज्या नेत्याचा कुणीही हात धरू शकत नाही त्या नितीश कुमारांनी दुसऱ्यांदा भाजपला डच्चू देण्याची तयारी केली आहे.