अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- भारतात 14 दिवसांत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 10 हजारांहून कमी आहे, तसंच देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४३ टक्के रुग्ण हे एकट्या केरळमध्ये आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
अग्रवाल यांनी देशातील कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या स्थितीबद्दल देखील माहिती दिली. भारतात आतापर्यंत Omicron प्रकाराच्या संसर्गाची एकूण 25 प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)याबाबत सतर्क केलं असून लसीकरणानंतरही सार्वजनिक आरोग्याच्या नियमांचं सातत्यानं पालन केले पाहिजे,
असं लव अग्रवाल यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक आरोग्याचे नियम शिथले केल्यास कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढू शकतात असा इशाराही WHO ने दिला आहे.
दरम्यान या व्हेरिएंटला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्याबाबत सहा राज्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या सहा राज्यांमध्ये केरळ, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा आणि मिझोराम यांचा समावेश आहे.
या राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य मंत्रालय चिंतेत आहे. केंद्राने राज्यांना टेस्ट, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच, केरळमध्ये कोरोनामुळे रुग्णांचा वाढता मृत्यूदर आणि वाढत्या रुग्णांवर आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधील चार जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत.
तसेच, तामिळनाडूतील तीन आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशीच स्थिती ओडिशा आणि मिझोरामची आहे. येथेही आरोग्य मंत्रालयाने काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम