अहिल्यानगर: जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नगर तालुक्यातील आगडगाव येथील कालभैरवनाथ देवस्थान कडून दर रविवारी भाविकांना आमटी भाकरीचा प्रसाद देण्यात येतो. या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात.
मात्र येत्या रविवारी केल्या जाणाऱ्या अन्नदानात चक्क आंब्याच्या रसाची मेजवाणी भाविकांना मिळणार आहे. यासाठी दीड हजार किलो आंब्यांची खरेदी करण्यात आली आहे. भाविकांच्या इच्छेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मेअखेर महाप्रसादात आमरसाची मेजवाणी देण्यात येते.

तथापि, भाविकांच्या इच्छेनुसार गुप्तदान केल्याने गुढीपाडव्याच्या दिवशीही हा उपक्रम करण्यात येणार आहे. त्यासाठी आंब्याची खरेदी करण्यात आली आहे. नैसर्गिक पद्धतीने हे आंबे पिकविण्यात येत आहेत. रविवारपर्यंत ते पक्व होतील. रविवारी पहाटे आरतीनंतर लगेचच नाश्ता दिला जातो. दुपारी बारा वाजता महाआरती होऊन आमरसाच्या प्रसादाला प्रारंभ होईल.
सायंकाळी सात वाजता कीर्तन होईल. या वेळी नगरच्या सोपानराव वडेवाले यांच्यामार्फत विशेष महाप्रसाद दिला जाणार आहे. या कार्यक्रमांना आॅष्ट्रेलियातील भाविक राकेशकुमार उपस्थित राहणार आहेत. देवस्थानाजवळ प्रत्येक रविवारी नाश्ता, महाप्रसाद व सायंकाळी कीर्तन व महाप्रसाद असतो.
दिवसभरात सुमारे दहा हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. प्रत्येक रविवारी देवस्थानाजवळ यात्रेचे स्वरुप येते. भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, देवस्थानाजवळ सुमारे एक कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. प्रत्येक रविवारी होणाऱ्या कीर्तनसेवेचा लाभही हजारो भाविक घेत आहेत.