Maharashtra news : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणी गेल्या चार वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आरोपींनी खुलं पत्र लिहिलं आहे.
यामध्ये त्यांनी सरकारवर आरोप करताना म्हटलं की, “आमचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यकर्त्यांनी षडयंत्र रचलं आहे. दलित, आदिवासी आणि वंचितांच्या बाजूनं सत्ताधारी शक्तिंविरुद्ध लढणाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे.

कामगार, विद्यार्थी, लेख, कवी, अभ्यासक, पत्रकार आणि सामान्यांना तुरुंगात टाकलं जातंय. यासाठी दहशतवादाचे कायदे निर्लज्जपणे वापरले जात आहे.” प्राध्यापक शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांनी हे पत्र लिहिलं आहे. २०१८ मध्ये या चौघांनाही एल्गार परिषद प्रकऱणी अटक झाली होती.
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यात झालेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव इथं हिंसाचार झाल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.
त्यानंतर ८ जानेवारी २०१८ रोजी पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत १६ जणांना अटक केली होती. यामध्ये नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापक शोमा सेन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांचा समावेश आहे.