रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा विरोधकांचा जीव मुंबईत आहे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

Content Team
Published:

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी विधानसभेत (Legislative Assembly) विरोधकांना चांगलेच ठणकावले आहे. तसेच सातत्याने पेनड्राइव्ह देणाऱ्या फडणवीस यांना रॉ, सीबीआयमध्ये (CBI) संधी दिली पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.

तसेच ठाकरे म्हणाले आरोप करणारे, ईडीला माहिती देणारे, चौकशी करणारे सारे तुम्हीच असल्याने ही ईडी (ED) आहे की, घरगडी, असा प्रश्न पडतो. कुटुंबाची बदनामी करायची, धाडी घालायच्या, मालमत्तांवर टाच आणायची हे शिखंडीचे राजकारण बंद करा आणि मर्दासारखे अंगावर या.

चला मी तुमच्याबरोबर येतो. मला आधी तुरुंगात टाका, मग पुरावे गोळा करा; पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, अशा शब्दांत ठाकरे यांनी विधानसभेत विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले.

दरम्यान,नवाब मलिक (Nawab Malik) यांची पाठराखण करत ठाकरे यांनी भाजपला अनेक सवाल केले आहेत. नवाब मलिक हे दाऊदचा हस्तक होते, तर पाच वेळा ते निवडणुकीत जिंकले तरी केंद्रीय यंत्रणांना ते माहीत नव्हते का? यंत्रणांनी दिवे लावून दाऊदचे हस्तक कोण ते शोधायला हवे होते, असे ते म्हणाले आहेत.

तसेच दाऊद कुठे आहे, कुणाला माहीत आहे का? यापूर्वी तुम्ही राममंदिराच्या नावाने निवडणूक लढवली. आता दाऊदच्या नावाने मते मागणार का? गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरपटत आणण्याची घोषणा केली होती. ओबामांनी घरात घुसून जसा लादेनला मारले तसा दाऊदला घरात घुसून मारण्याची हिंमत कधी दाखवणार?

सकाळच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता, तर याच अनिल देशमुख, मलिक यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसला असतात ना? ज्यावेळी देशातील बहुतांश लोक देशातील सध्याच्या नेतृत्वाचा तिरस्कार करीत होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठराखण केली होती. वर गेल्यावर बाळासाहेबांना काय उत्तर देणार?

तसेच बदनामीला आपण जराही घाबरत नाही; परंतु कोणत्या थराला जाऊन बदनामी करायची, तथ्यहीन आरोप करायचे याच्या मर्यादा तुम्ही ओलांडल्या आहेत.

एकच गोष्ट सतत सांगितली की, सत्य वाटायला लागते. केंद्रातील या तपास यंत्रणा हे तुमच्या हातातले बाण असून, ते लक्ष्यांच्या छातीत खुपसले जात आहेत. सातत्याने पेनड्राइव्ह देणाऱ्या फडणवीस यांना रॉ, सीबीआयमध्ये संधी दिली पाहिजे.

त्याचसोबत रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसा विरोधकांचा जीव मुंबईत (Mumbai) आहे. मुंबईसारखे शहर जगात नाही. मी मुंबईकर असल्याचा मला अभिमान आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe