अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- बँकेच्या बाहेर पाळत ठेवून पैसे काढून निघालेल्या ग्राहकांच्या हातातील बॅग हिसकावणारी आंतरराज्य टोळी पोलिसांनी पाळत ठेवून पकडली आहे. गुजरातमधील आरोपी असलेल्या या टोळीला ‘हेल्मेट गँग’ म्हणून ओखण्यात येते.
गॅंगमधील आरोपींची नावे… जिग्नेश दिनेश घासी (वय ४२), अजय उत्तम माचरेकर (वय ४५), राकेश बन्सी बंगाली (वय ४५), दीपक भिका इंदरेकर (वय ३०), मयुर दिनेश बजरंगे (वय ३३) व राजेश हरीयाभाई तमायचे (वय ४९, सर्व राहणार अहमदाबाद, गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे.

विशेषबाब म्हणजे महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा चार राज्यांत या टोळीविरूद्ध २५ गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, बॅगा चोरणारी टोळी नगरमध्ये आल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. चलाखीने चोरी करणाऱ्या टोळीला पकडणे चॅलेंज असल्याने पोलिसांनी देखील प्लॅन आखला.
पोलिसांनीही बँकेबाहेर पाळत ठेवण्यास सुरवात केली. नगर शहरातील बसस्थानकाजवळील एका बँकाजवळ पोलिसांना सापळा रचला. त्या दृष्टीने पोलिसांनी लक्ष ठेवले आणि गुन्हा करताना आरोपींना पकडले. पोलिसांना पाहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आधीच सावध होते.
त्यामुळे काही अंतरावरच सहा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन दुचाकी वाहने, मोबाईल, हेल्मेट, स्क्रू ड्राइव्हर, डिक्की खोलण्याचे साधन असा मुद्देमाल जप्त केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम