मोबाईल अ्ॅपवर होणार पीकनोंदणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- नव्या तंत्राचा वापर करून गैरव्यवहार कमी करणे, वेळेची बचत करणे आणि काम घरबसल्या करणे शक्य होत आहे.

राज्य सरकारनेही ई-प्रणालीवर भर दिला आहे. आता शेतक-यांच्या बाबतीतही सुखकर असा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल ॲपवर पिकांची नोंद करता येणार आहे.

‘माझी शेती माझा साताबारा… मीच लिहिणार माझा पीक पेरा’:-  राज्य शासनाने ई-पीक नोंदणी मोहिमेला शासनाने तत्वत: मान्यता दिली आहे. शासनाची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर लवकरच ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

याची जय्यत तयारी प्रशासनाने केली असून, ‘माझी शेती माझा साताबारा… मीच लिहिणार माझा पीक पेरा’ ही खास टॅगलाईन घेऊन ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

अचूक माहिती मिळवणे शक्य :- शासनाच्या ई- पीक नोंदणीमुळे राज्यातील कोणत्या भागात कोणते पीक घेतले आहे, याची अचूक माहिती आणि आकडेवारी मिळणे सहज शक्य होणार आहे. राज्यात येत्या एक जुलैपासून या मोहिमेचा आरंभ होणार आहे. पिकांची नोंद मोबाईल ॲॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

महसूल आणि कृषी विभागाचा संयुक्त उपक्रम :- राज्यात महसूल विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आता गावपातळीवरच पीकपेरणीची माहिती संकलित करणे, पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे,

कृषी पतपुरवठा सुलभ करणे या हेतूने ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी टाटा ट्रस्टने मोबाईल ॲप विकसित केले आहे.

प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प आठ जिल्ह्यातील २० तालुक्यांमध्ये राबविला होता. आता संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe