अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी बदली विरोधात दाखल केलेली याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) फेटाळून लावली आहे.
शासनाने राठोड यांची केलेली बदली योग्य व नियमाप्रमाणे असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची नांदेड येथून नगरमध्ये बदली झाली होती.
राठोड यांनी पदभार स्विकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांची आणि नेवासा पोलिस ठाण्यातील गर्जे नामक एका पोलिस कर्मचार्याची ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.
या ऑडिओ क्लिपची पोलिस दलासह जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर राठोड यांची नगरमधून बदली करण्यात आली. राठोड यांची खातेनिहाय चौकशी करत गृह विभागाकडे अहवाल सादर केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती.
बदली झाल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. बदलीविरोधात अॅड. किशोर जगदाळे यांच्यामार्फत राठोड यांनी मॅटकडे दाद मागितली होती. शासनाने राठोड यांना अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणाचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती दिली होती.
मात्र राठोड यांना नगरमध्येच नियुक्ती हवी असल्याने त्यांनी मॅटकडे याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती ए. पी. कुर्हेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. राठोड यांच्यावतीने अॅड. जगदाळे तर सरकारच्यावतीने अॅड. क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली.
याचिकाकर्ते राठोड यांच्याविरोधातील गंभीर तक्रारी व त्यांची बदली करताना नियमित प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे नमूद करत न्यायालयाने राठोड यांची याचिका फेटाळून लावली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम