India News: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील वाढत्या महागाईआणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
मात्र, यावेळी त्यांनी उपरोधिकरपणे टीका करीत वेगळाच दाखला दिला आहे. वाढत्या महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, तर मुघल जबाबदार आहेत. मुघलांनी देशात ताजमहाल बांधला नसता तर, आज पेट्रोल ४० रुपयांना उपलब्ध झाले असते.
ताजमहाल आणि लाल किल्ला बांधून मुघलांनी चूक केली. हा पैसा वाचवला गेला पाहिजे होता. म्हणजे २०१४ मध्ये मोदीजी आल्यानंतर त्यांना हे पैसे दिले गेले असते, अशी उपरोधिक टीका ओवैसींनी एका व्हिडिओतून केली आहे.
एआयएमआयएमच्या ट्विटर हँडलवरून ओवैसींचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यांनी म्हटले आहे, सर्व गोष्टींना मुस्लिम आणि मुघल जबाबदार आहेत. भारताच्या इतिहासात मुघल राजवट होती का? त्यापूर्वी सरकार नव्हते.
सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मौर्याचे सरकार नव्हते का? अनेक सरकारे होती. मात्र भाजपच्या नजरेत फक्त मुघल दिसत आहे. एका डोळ्यात मुघल आणि दुसऱ्या डोळ्यात पाकिस्तान. ‘आम्हाला मुघलांकडून काही घ्यायचे नाही आणि पाकिस्तानशी आमचा काही संबंध नाही.
भारत ही आपली मातृभूमी आहे ती आम्ही कधीही सोडणार नाही. प्रत्येकवेळी तुम्ही सोडून जा सोडून जा अशा घोषणा देत असता मात्र, आम्ही देश सोडणे तर दूरच असे म्हणत आम्ही जिवंत या भारताच्या धरतीवर राहू आणि मेलो तरी याच धरतीवर जाऊ असे ओवैसींनी त्यामध्ये म्हटले आहे.