अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- शेवगाव तालुक्यातील गदेवाडी शिवारातील लांडेवस्ती येथील विनायक किसन मडके (वय ६५) यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतेले आहे. मुकेश दत्तात्रेय मानकर, रुपेश दत्तात्रेय मानकर, मच्छिंद्र एकनाथ धनवडे (तिघेही रा. गदेवाडी, ता. शेवगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
दरम्यान याप्रकरणी विनायक मडके यांचा मुलगा तुळशीराम विनायक मडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आठ दिवसांपूर्वी विनायक मडके घोड्यावरून शेतात चालले होते. त्यावेळी वरील मुकेश मानकर, रूपेश मानकर, मच्छिंद्र धनवडे यांच्या वाहनाने कट मारला होता.

मडके यांनी याबाबत संबंधितांना विचारणा केली असता वाहनातून तिघांनी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. दुसऱ्या दिवशी गावात गेले असता त्या तिघांनी मडके यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर पुन्हा गावात भेटल्यावरही अशीच दमबाजी केली होती. ९ सप्टेंबरला रात्री ते तिघे विनायक मडके यांच्या घरी आले. त्यांना बाहेर बोलावून त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविले. वाहनात त्यांना मारहाण करण्यात आली.
त्यांचा मुलगा तुळशीराम मडके याने वाहनाचा पाठलाग केला. एका हॉटेलजवळ वाहन थांबलेले दिसले. तेथे त्या तिघांनी वडिलांना मारहाण केल्याचे तुळशीरामने पाहिले. ते पाहून तुळशीराम घरी गेला. भावाला सोबत घेऊन तो पुन्हा मारहाण केलेल्या ठिकाणी गेला. तेव्हा आरोपी पळून गेले होते.
वडील विनायक मडके यांचा मृतदेह तेथील बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. मुलांनी त्यांना रुग्णालयात नेले. त्यावेळी डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यावरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













