अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Employees Protest) सुरु आहे. एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्य सरकारने अहवाल आल्यानंतर एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे शक्य नसल्यचे सांगितले आहे. त्यानंतर भाजप नेते आणि एसटी कामगार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचारी आंदोलनात एन्ट्री मारल्याचे दिसत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.
एसटी संपाला पाठिंबा देणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिला राजकीय पक्ष आहे. अडचणीत याल तेवढं आंदोलन न खेचण्याचा सल्लाही दिला होता. उपटसुंभ कामगार नेत्यांच्या मागे लागल्यानं आज एसटी कामगारांची फसगत झाली.
एसटी महामंडळाचा निरोप दोन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला. मात्र, उद्धव ठाकरे हे केवळ नावाला मुख्यमंत्री आहेत अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग द्यावाच लागेल. हे चोर, लुटारूंचे सरकार आहे. जे कामगार कामावर रुजू झाले त्यांच्याकडून वसुली सुरू आहे. जेवढे दिवस कामावर गेला नाही त्याची नुकसान भरपाई घेतली जातेय.
पगार कपातीमुळे कामावर जावं की नको? असा प्रश्न कामगारांना पडलाय. सरकारला एसटी महामंडळ मोडीत काढायचं आहे. सत्ताधाऱ्यांना स्वत:च्या खासगी बसेस चालवायच्या आहेत.
एसटी महामंडळ मोडण्यासाठी संप हे साधन त्यांना मिळालं आहे. यासाठीच सत्ताधारी आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री आणि सत्तेतील राजकीय पक्षांचे अध्यक्ष यांचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप देखील आंबेडकरांनी केला आहे.