India News :ना खाऊंगा ना खाने दुंगा, असा मंत्र म्हणत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबद्दल नागरिकांना नेहमीच उत्सुकता असते.
त्यातच मोदी यांनीच आपल्यासह आपल्या मंत्र्यांनाही दरवर्षी संपत्ती जाहीर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नुकतीच मोदी यांच्यासह इतर मंत्र्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे.
त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्या संपत्तीत वर्षभरात २६ लाखांची वाढ झाली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती २.२३ कोटी रुपये झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ३१ मार्चपर्यंतच्या आपल्या मालमत्तेचा ताजा तपशील जाहीर केला आहे. या तपशीलानुसार, मोदी यांची कोणत्याही बॉण्ड, शेअर्स, म्युचुअल फंडात गुंतवणूक नाही. त्यांच्याकडे १.७३ लाख रुपये मूल्याच्या सोन्याच्या चार अंगठ्या आहेत.
मोदी यांची जंगम मालमत्ता गेल्या वर्षभरात २६.१३ लाख रुपयांनी वाढली आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत मोदी यांच्याकडे १.१ कोटी रुपये मूल्याची स्थावर मालमत्ता होती.
मात्र आता त्यांच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. ३१ मार्च २०२२ पर्यंत पंतप्रधान मोदी यांची एकूण मालमत्ता दोन कोटी २३ लाख ८२ हजार ५०४ रुपये आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २००२मध्ये गांधीनगरमधील एक निवासी भूखंड अन्य तीन मालकांसह संयुक्तपणे विकत घेतला होता.
त्यामध्ये चौघांचाही समान हिस्सा होता. सर्व्हे क्रमांक ४०१/ए या भूखंडामध्ये मोदी यांचा २५ टक्के हिस्सा होता, तो त्यांनी दान केला आहे.
३१ मार्च २०२२ पर्यंतच्या तपशीलानुसार, पंतप्रधान मोदी यांच्याकडे ३५ हजार २५० रुपये रोख होते. त्यांच्याकडे नऊ लाख पाच हजार १०५ रुपये मूल्याची पोस्टातील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे आहेत. तर, एक लाख ८९ हजार ३०५ रुपयांच्या जीवन विमा पॉलिसी आहेत.