Maharashtra news : राज्यातील सर्वत कारागृहांत सध्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे १६६ टक्के कैदी आहेत. राज्यभरातील कारागृहांची मिळून कैदी ठेवण्याची एकूण क्षमता २४ हजार ७७२ असून सध्या या कारागृहातून ४० हजार ९४६ कैदी ठेवण्यात आले आहेत.
यामुळे कैद्यांना कोरोनासह संसर्गजन्य अन्य आजारांची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नसणाऱ्या अनेक कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते.

संसर्ग कमी होत नसल्याने त्यांच्या पॅरोलची मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र, मधल्या काळात कैदी परतले, तसेच नवे कैदीही दाखल झाले. त्यामुळे सध्या राज्यातील सर्वच मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहात मिळून क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत.
सर्वाधिक गर्दी पुण्याच्या येरवडा कारागृहात झाली आहे. त्याची क्षमता २४४९ कैद्यांची असताना सध्या या कारागृहात तब्बल ६ हजार ८६६ म्हणजे क्षमतेच्या २८८ टक्के जास्त कैदी आहेत. मुंबईतील आर्थर रोड कारागृहात क्षमतेच्या सुमारे तिप्पट कैदी आहेत.
याशिवाय बुलढाणा, कल्याण, नांदेड, नाशिक येथील कारागृहांचीही अशीच स्थिती आहे.यामुळे कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनासोबत अन्य संसर्गजन्य आजारांची भीती आहे.
अनेक कैद्यांमध्ये त्वचेचे आणि अन्य प्रकारचे आजार झाल्याचे आढळून येत आहे. वाढत्या संख्येमुळे त्यांचा झपाट्याने प्रसार होत असून नियंत्रणही अवघड होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.