Ahmednagar News : राळेगणसिद्धीत उदयापासून जमावबंदी, का दिला हा आदेश?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2022 Ahmednagar News :- पारनेर तालुक्यातील टँकर गैरव्यवहार प्रकरणी तालुक्यातील एका संस्थेतर्फे राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोमवारपासून (११ एप्रिल) राळेगणसिद्धीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.

लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे आणि बबनराव कवाद यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. या गैरव्यवहारात अडकलेल्या कंपनीचे काही पदाधिकारी राळेगणसिद्धीचे आहेत.

त्यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि ग्रामसभेने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, या खासगी कंपनीशी हजारे आणि ग्रामपंचायतीचा काहीही संबंध नसल्याचे सांगत उपोषण करण्यास ग्रामपंचायतीने परवानगी नाकारली आहे.

तरीही आंदोलक ठाम असल्याने प्रशासनाने हजारे यांच्या सुरक्षेचे कारण सांगत जमावबंदीचा आदेश दिला आहे. हजारे यांना झेड दर्जाची सुरक्षा असल्यामुळे व उपोषणकर्ते हजारे यांच्याशी संबंधित विषयावर उपोषण करत असल्यामुळे येथे कायदा-सुव्यवस्था व हजारे यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. असे कारण देवून राळेगणसिद्धीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

पारनरेचे उपविभागीय दंडाधिकारी सुधाकर भोसले यांनी हा आदेश दिला. जमावबंदी लागू केली असली तरी आम्ही उद्या राळेगणसिद्धीत प्रवेश करून यादवबाबा मंदिरात शांततेच्या मार्गाने उपोषण करणार आहोत. आम्ही तेथे कायदा-सुव्यवस्था, शांतता पाळून व अण्णांच्या सुरक्षेला बाधा न होता आंदोलन करणार आहेत, असे रामदास घावटे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe