Ram Shinde: शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप आला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA) अल्पमतात आली असून आता राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
यामुळे येत्या एक दोन दिवसात महाविकास आघाडी सरकार रहाणार कि जाणार याचा निर्णय होणार आहे. यावरूनच आता नुकताच विधानपरिषदेमध्ये निवडून आलेले आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लावला आहे.

अहमदनगर शहरात राम शिंदे यांची विधान परिषदेवर निवड होऊन आमदार झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले पहिला डोस हा राज्यसभेचा होता, दुसरा डोस विधान परिषदेचा होता. तर आता तिसऱ्या बूस्टर डोससाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम करून निर्विवादपणे भाजपचे वर्चस्व निर्माण करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
राम शिंदे पुढे म्हणाले कि भाजप आता राज्य सरकारला बूस्टर डोस देण्याच्या तयारीत आहे. यामुळे जिल्ह्यात आता कोणी पक्ष सोडून जाणार नाही. आपल्या जिल्ह्यातील दोन जिल्हा परिषद सदस्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता ते तोंडावर आपटले असतील. येत्या काळात भाजपचे पूर्ण ताकदीने राज्यात सरकार येणार आहे, असं मोठं वक्तव्य राम शिंदे यांनी केलं.
राज्यात आणि देशात जेव्हा केव्हा पोटनिवडणुका होतात तेव्हा भाजपचे सरकार पुन्हा येताना दिसतंय. नगर जिल्ह्यात यापेक्षा वेगळं वातावरण राहणार नाही. आणखी एक आमदार जिल्ह्यात वाढणार आहे. आता चार आमदार झाले आहेत. पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय आपल्याला उपयोगात आणायचा आहे.असं राम शिंदे म्हणाले.