Maharashtra News:कोरोनाकाळात घटलेल्या मद्यविक्रीने पुन्हा जोर धरला असून बिअरच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसत आहे. दा राज्यात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत बिअरची १६.९० कोटी लीटर विक्री झाली आहे.
तर गेल्यावर्षी याचकाळात ९.३२ कोटी लीटर बिअरची विक्री झाली होती. गेल्या सहा महिन्यांत मागील वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ८१ टक्के अधिक बिअरची विक्री झाली आहे.
त्यातून गेल्या साडेसहा महिन्यांत राज्याच्या तिजोरीत सुमारे १० हजार कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे.
टाळेबंदीत सर्वजण घरात बंद होते. तसेच कार्यालये, पार्ट्या बंद असल्याने मद्यविक्री मंदावली होती. मात्र करोनानंतर आता पुन्हा मद्यविक्री वाढली आहे. वाइनची विक्रीही ५१.५२ टक्क्यांनी वाढली आहे.
यंदा ४९ लाख लीटर वाइनची विक्री झाली आहे. तर गेल्यावर्षी याच काळात ३२.४ लाख लीटर वाइनची विक्री झाली होती. विदेशी मद्याची विक्री गेल्या वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबरच्या १०.३४ कोटी लीटरवरून १२.९७ कोटी लीटरवर पोहोचली आहे.
देशी मद्याची विक्री १५ कोटी लीटरवरून १८.९४ कोटी लीटरवर गेली आहे. या दोन्ही मद्यांच्या विक्रीत सुमारे २६ टक्के वाढ झाली आहे. मद्यविक्रीतील वाढीमुळे राज्याच्या तिजोरीतही मोठा महसूल जमा झाला आहे.
१ एप्रिल २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२२ या काळात राज्याच्या तिजोरीत सुमारे १० हजार ३४ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात सुमारे ७,१९८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. त्यामुळे यंदा महसूलात तब्बल ३९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.