अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील बहुतांश रस्ते हे नादुरुस्त आहेत. तर अनेक रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे.रस्त्यांवरील मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहन चालविताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे.
यातच कल्याण महामार्गावरील शिवाजीनगर ते आयुर्वेद कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या मार्गाची चार दिवसांत दुरुस्ती करावी,
अन्यथा नागरिकांसह पुलावर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा सेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सेनेचे नगरसेवक शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण परियोजना निदेशक प्रफुल्ल दिवाण यांना याबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, की रस्त्यावर पावसाळ्यात गुडघ्याएवढे खड्डे झाले आहेत.
या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. प्रत्येकी वर्षी पावसाळा आला की रस्त्यावर पुन्हा जीवघेणे खड्डे तयार होतात व ज्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जातो.
या खड्ड्यांमुळे दररोज अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यातील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. येत्या चार दिवसांत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा येत्या शुक्रवारी कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलावर रस्ता रोको करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम