अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- ‘निळवंडे धरण व कालव्यांची कामे आपल्या हातून होणे हे नियतीच्याच मनात होते. म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर या कामाला गती दिली. २०२२ च्या मध्यापर्यंत दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आपला प्रयत्न आहे.
यासाठी कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू आहेत. निळवंडे धरण पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असणार आहे.

असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना थोरात यांनी या कामाबद्दल माहिती देत आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या.
थोरात म्हणाले, भंडारदरा धरण साखळीत येणाऱ्या निळवंडे प्रकल्पाचे काम अनेक वर्षे विविध टप्प्यांवर रखडले आहे. आता या प्रकल्पातील कामे वेगाने सुरू झाल्याने प्रकल्प पूर्ण होण्यासंबंधी आशा पल्ल्वीत झाल्या आहेत.
थोरात म्हणाले, या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनंत अडचणींवर मात करत धरण पूर्ण केले. कालव्यांसाठी मोठ्या बोगद्यांची कामे मार्गी लावली.
मात्र मागील भाजप सरकारच्या काळात पाच वर्षे कामे थांबली होती. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर जेथे कालव्यांच्या कामावर दोन जेसीबी कार्यरत होते तेथे आता ३५ जेसीबी रात्रंदिवस काम करत आहेत.
दोन्ही कालव्यांची कामे अत्यंत वेगाने सुरू आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून २०२२ च्या मध्यापर्यंत या भागाला पाणी देणे हा आपला ध्यास आहे.
तालुक्यातील सहकारी संस्था व गावांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. सातत्याने काम करतो. त्यामुळे संगमनेरचा लौकिक राज्यात निर्माण झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम