Maharashtra news:विधान परिषद निवडणूकीत मतं फुटल्यावरुन कॉंग्रेस कारवाई तरी कोणावर करणार असा सवाल करतानाच तत्व आणि विचारांना तिलांजली देवून, सत्तेत सहभागी झाल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनीच माफी मागीतली पाहीजे असे वक्तव्य भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून मध्यावधी निवडणूकांची होत असलेली वक्तव्य ही नैराश्येच्या भावनेतूनच असल्याची प्रतिक्रीया माध्यमांशी बोलताना त्यांनी व्यक्त केली.आ.विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणारे सरकार हे विकासाचे आणि विचारांचे आहे.
जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर आल्याने पुढील अडीच वर्षेच काय तर, पुढील अनेक वर्षे हे सरकार जनतेसाठी काम करून आघाडी सरकारच्या काळात आधोगतीला गेलेले राज्य प्रगतीपथावर आणण्यासाठी हे सरकार काम करेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा अनुभव आणि त्यांची कार्यक्षमता यामुळे राज्य निश्चितच पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणूकीत कॉंग्रेसची मतं फुटल्यामुळे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षातील आमदारांवरच कारवाई करण्याच्या केलेल्या मागणीवर भाष्य करताना आ.विखे पाटील म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष आता कारवाई तरी कोणावर करणार? कारवाई करायला या पक्षात माणसं तरी किती शिल्लक राहीली आहेत,
याकडे लक्ष वेधून मुळातच आपल्या विचारांना आणि तत्वांना तिलांजली देवून कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाला होता. धोरणांचा, विचारांचा आणि कार्यकर्त्यांचा विचार न करता सत्ता भोगल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनीच माफी मागण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य आ.विखे पाटील यांनी केले.
राज्यात शिवसेनेचीही कॉंग्रेसपेक्षा वेगळी परिस्थिती नाही. नेतृत्वावर विश्वास न राहील्यानेच अनेकजण नेतृत्वापासुन दूर चालले आहेत. ५५ आमदारांपैकी ४० आमदार एकावेळी निघून जातात.
१२ खासदारही त्याच विचारात आहेत, आणखी किती माणसे दूर जातील याचा अंदाज शिवसेनेच्या नेतृत्वाला आता राहीलेला नाही. सत्तेसाठी भरकटलेले जहाज यांचे होते. त्यामुळेच बेताल वक्तव्य करणारे प्रवक्ते आता पक्षात दिसतील असा खोचक टोला आ.विखे पाटील यांनी लगावला.