१५०० रुपये येणार खात्यात… फक्त ‘हे’ कागदपत्र आहे महत्वाचे

Published on -

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील निराधार व्यक्तींसाठी राज्य सरकारच्या विशेष साहाय्य योजनांअंतर्गत मिळणारे मासिक अनुदान आता थेट डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या सुविधेसाठी आधारकार्ड अपडेट करणे आणि मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याने या कामात आघाडी घेतली असून ९९ टक्के लाभार्थ्यांचे आधार अपडेट पूर्ण झाले आहे.

उर्वरित कामही लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासह इतर विशेष साहाय्य योजनांचा लाभ आता वेळेवर आणि सुलभतेने मिळणार आहे.

यापूर्वी या योजनांच्या अनुदानात मोठा विलंब होत असे, ज्यामुळे वयोवृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांना बँकेत जाऊन खात्याची माहिती घ्यावी लागत होती. या त्रासाला आता पूर्णविराम मिळाला आहे.

डीबीटी पद्धतीमुळे अनुदान थेट खात्यात येणार असल्याने लाभार्थ्यांची हेळसांड थांबली आहे, तसेच बँक कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी झाला आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलनाची मोहीम हाती घेतली.

जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हे काम ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असले, तरी श्रीरामपूरने यात बाजी मारली आहे. आधार अपडेट न झाल्यास लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते, यासाठी हयातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबुक आणि जोडलेला मोबाइल क्रमांक ही कागदपत्रे महत्त्वाची आहेत.

या मोहिमेचे यश तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले. नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, मंडलाधिकारी डी.बी. शेकटकर, अव्वल कारकून एन.जी. नाईक आणि आयटी सहायक रज्जाक बागवान यांनी या कामात मोलाची भूमिका बजावली.

मंडल स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून तलाठ्यांच्या मदतीने प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यात आले. या शिबिरांमध्ये हयातीचे दाखले आणि आवश्यक कागदपत्रे गोळा करून आधार अपडेटची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली.

श्रीरामपूर तालुक्यात संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेचे एकूण ५,२६५ लाभार्थी आहेत, त्यापैकी ५,२१६ जणांचे आधार अपडेट झाले असून, फक्त ४९ लाभार्थ्यांचे काम शिल्लक आहे, जे लवकरच पूर्ण होईल. या कामगिरीमुळे श्रीरामपूरने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe