Maharashtra Politics : “शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हेच जबाबदार”

Published on -

Maharashtra Politics : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शिंदे गटातील आमदारांवर खोक्यांचा आरोप केला जात आहे. मात्र शिंदे गटातील आमदारही त्यांना सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे वारंवार शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचा आरोप करत असतात.

बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेलाही उत्तर दिले आहे.

संजय राऊत हे वारंवार सरकार पडेल अशी वक्तव्ये करत असतात. पण हे भविष्य सांगायला तो जोशी कधीपासून झाला असा खोचक सवाल जाधव यांनी केला आहे.

संजय राऊत हे अशी वक्तव्य करून केवळ जनतेची करमणूक करत आहेत असा टोमणाही प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

प्रतापराव जाधव माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, हे पहिल्यांदाच नाही बोलले. रोज सकाळी उठले की खोके आणि बोके हाच विषय त्यांच्याकडे उरला आहे. अतिशय नैराश्यामुळे ते असे बोलतात. त्यांच्या आरोपात तथ्य नाही, असेही ते म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर जाधव यांनी आरोप देखील केलं आहे. ते म्हणाले, शिवसेना संपवण्यासाठी संजय राऊत हेच जबाबदार आहेत. संजय राऊत यांनी छातीवर हात ठेऊन सांगावे, की खरंच तो शरद पवार यांचा निष्ठावान आहे, की उद्धव ठाकरे यांचा..

शरद पवारांकडून सुपारी घेऊनच शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत यांनी केलं आहे. राहिलेली शिवसेना संपवून शरद पवार यांची शाबासकी मिळवणार आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe