अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- माजी सरपंचाने वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धदक्कादायक घटना साताऱ्यातील पळसवडे येथे घडली आहे.
मारहाण झालेली महिला कर्मचारी तीन महिन्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आपल्या पत्नीसोबत महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे गस्त घालण्यासाठी आले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दांपत्य सिंधू सानप यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचं दिसत आहे.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होऊ लागला होता. यानंतर सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी सरपंच आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या घटनेची दखल घेतली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत सांगितलं की, “आरोपींना आज सकाळी अटक करण्यात आली असून कठोरात कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची कृत्यं सहन केली जाणार नाहीत”.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम