निळवंडेचे श्रेय शरद पवारांचे ! फुकटचे श्रेय भाजपा-शिंदे सरकारने व पालकमंत्र्यांनी घेऊ नये

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics News : निळवंडेचे काम आम्ही केले असा डांगोरा पिटुन भाजप व त्यांचे नेते श्रेय घेऊ पाहत आहेत. मात्र वेळोवेळी या धरणात अडथळे कुणी आणले हे जनतेला ठाऊक आहे.

या धरणाचे श्रेय शरद पवारांना आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के यांनी पत्रकात म्हटले आहे. म्हस्के यांनी म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नगर जिल्ह्यातील उत्तर विभागातील अकोले, संगमनेर, राहता,

राहुरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिसरातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी निळवंडे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊन त्याचे भूमीपूजनही केले. मात्र सुरुवाती पासूनच काही नेत्यांनी हा प्रकल्प राजकीय साठमारीत अडकवून ठेवला.

त्यामुळे प्रकल्पाचे काम रेंगाळले. राज्यात आघाडीची सत्ता आल्यावर पवार यांनी पुन्हा या प्रकल्पात लक्ष घातले. अजित पवार यांचेकडे अर्थखाते व जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांचेकडे जलसंपदा खाते आल्यावर त्यांनी तसेच कॉंग्रेसचे तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला.

तसेच साडेआठ वर्षे नगरचे पालकमंत्री पद सांभाळणारे दिलीप वळसे पाटील यांनीसुद्धा निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांच्या प्रयत्नामुळे निळवंडेसाठी दरवर्षी निधी मंजूर होत राहिला. त्यातून या धरणाचे काम मार्गी लागले.

२००८ मध्ये या धरणात पाणी साठविण्यास प्रारंभ झाला. २०१२-१३ मध्ये पूर्ण क्षमतेने धरण भरले तेव्हा पासून दर पावसाळ्यात साडेआठ टीएमसी पाणी साठा भंडारदरा लाभक्षेत्रातील बागायतदार वापरत आहेत. कॉग्रेस आघाडी सरकारच्या काळातच धरण व कालवे बांधून तयार झाले.

तत्कालीन आघाडी सरकारने २३०० कोटींचा खर्च या प्रकल्पावर केला. या प्रकल्पासाठी केंद्रातील मोदी सरकारने एक छदामसुद्धा दिला नाही आम्हीच धरण बांधले आणि आम्हीच शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहोत असा खोटा अविर्भाव आणि फुकटचे श्रेय भाजपा-शिंदे सरकारने व पालकमंत्र्यांनी घेऊ नये अशी टीका म्हस्के यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe