Maharashtra News:राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आतापर्यंतच्या वादग्रस्त वक्तव्यावर सोयीस्कर मौन पाळणाऱ्या भाजपने यावेळी मात्र पक्षाला त्यांच्यापासून वेगळे केले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होऊ, नये या शक्यतेमुळे भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हात झटकले आहेत. त्यामुळे यावेळी राज्यपाल एकाकी पडल्याचे दिसून आले.

गुजराती आणि राजस्थानी लोकांना वेगळे केले तर मुंबई आर्थिक राजधनी राहणार नाही, असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले. हा मराठी माणसाचा अवमान असल्याची टीका सुरू झाली.
त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भाजप या वक्तव्याशी सहमत नसल्याचे म्हटले तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं विधान वैयक्तिक असून आम्ही त्यांच्याशी सहमत नाही.
मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं योगदान नाकारता येणार नाही. राज्यपालांनी कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे शिंदे यांनी म्हटले आहे.दरम्यान, यावरून चोहोबाजूंनी टीका सुरू झाल्यावर स्वत: कोश्यारी यांनीही स्पष्टीकरण दिले आहे.
‘काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो.
मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली याचा मला अभिमान वाटतो,’ असे राज्यपाल यांनी म्हटले आहे.