Maharashtra news : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे सहावे उमेदवार संजय पवार पराभूत झाल्यावर कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्विट करत आपल्या भावना मांडलेल्या आहेत.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
म्हणजेच, वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते.
या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता, मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला.
संजय राऊत यांनी तर आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांच्यावर घालण्यात आली होती.
पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा ४२ मतांचा फुगा फुटला आहे. जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अटी लादत होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज केलेले ट्विट चर्चेत आहे.