Loksabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २०१९ मध्ये लढवलेल्या सर्वच्या सर्व २२ जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदारांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत जिंकलेल्या १८, तर पराभूत झालेल्या ४ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेना शिंदे गटातील सर्व १३ खासदारांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्यातील मंत्र्यांवर प्रत्येकी दोन ते तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले. २०१९ साली लढवण्यात आलेल्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला. २२ ठिकाणी शिवसेनेचा महायुतीचा खासदार निवडून आणण्यावर भर दिला जाईल.
विद्यमान १३ खासदारांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, महायुतीत आता राष्ट्रवादी आला असला, तरी उर्वरित ठिकाणी उमेदवारीबाबत भाजप आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून शिंदे निर्णय घेतील, अशी माहिती शेवाळे यांनी बैठकीनंतर दिली.
जागांच्या अदला-बदलीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील
२०१९ मध्ये आम्ही लढवलेल्या सर्व २२ जागा आताही लढवणार आहोतच. मात्र, यातील एखादी जागा बदलायची झाल्यास त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. ज्या ठिकाणी समोर राष्ट्रवादीचा उमेदवार असेल,
त्या ठिकाणी मुख्यमंत्री निर्णय घेतील. शिरूरच्या जागेबाबतही ते निर्णय घेतील. विद्यमान १३ खासदारांच्या मतदारसंघांत मुख्यमंत्री दौरे करणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संपर्कप्रमुखही नेमले जातील. वेगवेगळ्या समन्वय समित्याही नेमण्यात येणार असल्याचे शेवाळे म्हणाले.