धक्कादायक ! 350 हून अधिक पिशव्यांमध्ये आढळून आले बनावट सोने

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेमधील सोन्यांच्या 350 हून अधिक पिशव्यांमध्ये बनावट सोने आढळले आहे.

अजून एकूण किती पिशव्यामध्ये बनावट सोने आहे, हे लवकरच समोर येणार असल्याचे बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांनी सांगितले.

अर्बन बँकेच्या शेवगाव या तालुका पातळीवरील शाखेतून गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर सोनेतारण कर्ज वाटप झाले. तारण सोन्याचे बनावट व्हॅल्युएशन दाखवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटण्यात आले.

मुदत संपल्यानंतरही या कर्जाचा भरणाच केला गेला नाही. त्यामुळे २३ जून रोजी बँकेच्या नगर येथील मुख्यालयात तारण सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता. या लिलावात सहभाग घेण्यासाठी सराफ जमले होते.

सोन्याच्या ३६४ पिशव्यांचा लिलाव होता; मात्र पहिल्या पाच पिशव्या उघडताच त्यात सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने निघाले.

त्यानंतर लिलावाची प्रक्रिया लगेच थांबविण्यात आली. बँकेतील अधिकाऱ्यांनी उर्वरित पिशव्यांमधील सोन्याची तपासणी केली तेव्हा ३६४ पैकी साडेतीनशेहून अधिक पिशव्यांमधील सोनेही बनावट असल्याचे आता समोर आले आहे.

दरम्यान नगर अर्बन बँक अनेक वर्षांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडलेली आहे. कोट्यवधी रुपयांची बोगस कर्ज दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडेही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास चालू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe