Silver Rate : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी दिवसभरात घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे चांदीच्या दरांनी सर्वांनाच धक्का दिला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या व्यवहारात चांदीचा दर चार लाखांच्या जवळपास पोहोचला असून, वाढलेले दर पाहून ग्राहकांसह व्यावसायिकांचेही डोळे पांढरे झाले आहेत.
सलग वाढत्या दरांमुळे संबंधित सर्व व्यावसायिकांनी अक्षरशः डोक्याला हात लावून घेतला आहे. जागतिक कमोडिटी बाजारात सध्या चांदी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. चीन आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चांदीच्या किमतींमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा दर सुमारे १०९ डॉलर प्रति औंस असताना, चीनमध्ये हाच दर तब्बल १२५ डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच प्रति औंस जवळपास १६ डॉलरचा फरक दिसून येतो. तज्ज्ञांच्या मते, चीनमधील प्रचंड मागणी हे या फरकाचे मुख्य कारण आहे.
चीनमध्ये चांदीचा वापर आता केवळ दागिन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. गुंतवणूक, इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा प्रकल्प, बॅटरी उत्पादन, वैद्यकीय उपकरणे आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.
विशेषतः हरित ऊर्जा आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढती गुंतवणूक चांदीच्या मागणीत सातत्याने भर घालत आहे. याशिवाय, चीनमधील आर्थिक अनिश्चितता, रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी आणि शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून चांदीकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत.
दरम्यान, जागतिक पातळीवर चांदीचा पुरवठा अपेक्षेइतका वाढलेला नाही. काही देशांतील खाण उत्पादनातील अडथळे, वाढते उत्पादन खर्च आणि कडक पर्यावरणीय नियमांमुळे पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीचा थेट परिणाम किमतींवर होत आहे.
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत चांदीने विक्रमी झेप घेतली आहे. एक जानेवारी रोजी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो चांदीचा दर २ लाख ४२ हजार रुपये होता. २४ जानेवारीपर्यंत तब्बल ९२ हजार ७५० रुपयांची वाढ होऊन दर ३ लाख ३४ हजार रुपयांवर पोहोचला.
सोमवारी २६ जानेवारीला दिवसभरात आणखी ३० हजार ९०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आणि दर ३ लाख ६५ हजार ६५० रुपयांवर गेला. रात्री उशिरा बाजार बंद होईपर्यंत आणखी १५ हजार ३५० रुपयांची वाढ होऊन जीएसटीसह प्रति किलो चांदीचा दर ३ लाख ८१ हजार १०० रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला.
बाजार विश्लेषकांच्या मते, चीनमधील औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकदारांचा कल कायम राहिल्यास पुढील काळात चांदीच्या किमतींमध्ये आणखी मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. त्यामुळे चांदीचा बाजार येत्या काळातही चर्चेत राहण्याची शक्यता आहे.













