नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी नागपूरची माती आणि वातावरण चांगलं आहे. राऊतांनी वारंवार विदर्भात येईल. त्यामुळे त्यांना कदाचित सुबुद्धी सूचेल असा टोला शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लगावला होता.
मात्र संजय राऊत यांनी आज मीडियाशी (Media) संवाद साधताना फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. राऊत बोलताना म्हणाले, फडणवीस नागपूरचे (nagpur) सुपुत्र आहेत. त्यांना काल तुम्ही लोकांनी प्रश्न विचारला. त्यांचं म्हणणं असं आहे की नागपूरमध्ये आल्यावर राऊतांना सदबुद्धी मिळेल.
आम्हाला सुबुद्धी मिळेल असं वाटतं तर तुम्हाला का नाही मिळाली? तुम्हाला अडीच वर्षापूर्वी मिळाली असती तर देशाचं राज्याचं राजकारण वेगळ दिसलं असतं. कदाचित तुम्ही मुख्यमंत्री असता, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच ते म्हणाले, तुम्ही मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्हाला सदबुद्धीचं अजीर्ण झालं. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची युती झाली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे आमची बुद्धी आण सद्धबुद्धी आम्हाला ईश्वराने दिली आहे. त्यानुसार आम्ही काम करतो, असा टोलाही यावेळी राऊत यांनी लगावला आहे.
दरम्यान संजय राऊत नागपूरमधून बोलत असताना यावेळी त्यांनी इंडियन बार कौन्सिलने पाठवलेल्या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली आहे. मला कोर्टाचा सामना करावा लागत आहे. दिलासा घोटाळा कोर्टात सुरू आहे.
केवळ एकाच विचारधारेच्या लोकांना दिलासा मिळत आहे. दुसऱ्यांना मिळत नाही. देशाच्या न्यायव्यवस्थेत असं होत आहे. याबाबत माझ्याविरोधात इंडियन बार कौन्सिलने याचिका दाखल केली आहे. मी त्याला उत्तर देईन, असे संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.