तेव्हा फडवणीस मोदींना सांगतील का, महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली.

पण देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली अन्् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली, तर तेव्हा फडणवीस महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असं मोदींना सांगतील का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.

खा. राऊत रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे सध्या केंद्र सरकार स्वत:च्या पक्षाचा स्वार्थ पाहत आहे. पंतप्रधान मोदी यांना देशातील कोरोना परिस्थितीचं गांभीर्य नाही.

सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लॉकडाऊन लागू करावा लागेल का, याचा विचार झाला पाहिजे. मात्र, केंद्र सरकार प्रत्येकवेळी आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून निर्णय घेते. तुमचे लोक प्रचार करत आहेत किंवा निवडणुका आहेत म्हणून माणसं मारता येणार नाही.

निवडणुका आणि राजकारणापेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली. लोकांना लॉकडाऊन नको, असे त्यांनी सांगितले. हे योग्य आहे.

मात्र, ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. पण मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय फडणवीसांकडे आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रात बसून आम्हाला ज्ञानामृत वाटण्याची गरज नाही.

त्यांनी मुंबई किंवा पुण्यात येऊन येथील परिस्थिती बघावी, असे राऊत म्हणाले. लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या औषधांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होणे योग्य नाही. फक्त गुजरात तुमचा नाही तर संपूर्ण देश तुमचा आहे.

तुमचे गुजरातवर अधिक प्रेम आहे, हे समजू शकतो. पण आपण देशाचे पंतप्रधान आहोत, ही गोष्ट मोदी यांनी लक्षात ठेवायला हवी, असेही राऊत म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe