“कधी झेंडा तर कधी रंग वेगळा दाखवता, आम्ही शिर्डीला गेलो बोभाटा केला का?”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेही आयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ज्याला आयोध्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, भारतात कोणी कुठेही जाऊ शकतो. त्याचा इतका बोभाटा करायचे काम नाही.

आम्हीही शिर्डीला गेलो पण बोभाटा केला नाही. पण काहींना आम्ही काहीतरी वेगळं करून दाखवतोय, असे दाखवायचे आहे असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

अजित पवार यांनी हनुमान चालीसा विषयीही भाष्य केले आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व मराठी माणसांना एकत्र ठेवण्याचे काम केले. ते कोणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या रस्त्याने शिवसेना पुढे चालली आहे.

तो मराठी माणूस तुमच्या सोबत येत नाही म्हणून कधी झेंडा तर कधी रंग वेगळा दाखवता, असे म्हणत अजित पवार यांनी हटके स्टाईल मध्ये विरोधकांना टोले लगावले आहेत.

अजित पवार यांनी कोल्हापूर निवडणुकीवरून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना चिमटे काढल्याचे दिसले. चंद्रकांत पाटील हे निवडणुकीत पराजय झाल्यानंतर हिमालयात जाणार असे म्हंटले होते याच मुद्यवरून अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

अजित पवार म्हणाले, निवडणुकीत कोणाचा जय तर कोणाचा पराजय होत असतो. त्यामुळे अशा वक्तव्यांना जास्त महत्व देण्याचे कारण नाही. कोणीही सगळं सोडून हिमालयात जाणार नाही हे आपल्यालाही कळत असे अजित पवार म्हणाले.