पोलिसाचा मुलगा; पण टोळी करून गुन्हेगारीकडे वळला, आता झाली ही कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- गंभीर स्वरूपाचे 32 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार सागर अण्णासाहेब भांड (वय 28 रा. ढवणवस्ती, अहमदनगर) टोळीविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.

यामध्ये टोळीप्रमुख असलेला सागर भांडसह रवी पोपट लोंढे (वय 22 रा. घोडेगाव ता. नेवासा), निलेश संजय शिंदे (वय 21 रा. पारिजात चौक, पाईपलाईन, अहमदनगर), गणेश रोहिदास माळी (वय 21 रा. वरवंडी ता. राहुरी), नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय 22 रा. मोरेचिंचोरे ता. नेवासा) व रमेश संजय शिंदे (वय 21 रा. बारागाव नांदुर ता. राहुरी) यांचा समावेश आहे.

या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. टोळीप्रमुख सागर भांड हा वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून गुन्हेगारीकडे वळला. विशेष म्हणजे सागर हा पोलिसाचा मुलगा आहे.

त्याचे वडील पुणे जिल्हा पोलीस दलात होते. पैशाच्या मोहामुळे सागर गुन्हेगार बनला. टोळी तयार करून फसवणूक, रस्ता लूट आणि दरोड्याचे गुन्हेही त्याने केले. एकदा त्याला अटक झाली. जामीनावर सुटल्यावर त्याने गुन्हे सुरू केले.

त्याच्या टोळीविरूद्ध तब्बल 32 गुन्हे दाखल आहेत. तो बीएचएमएस या वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत होता. पुढे त्याने शिक्षण अर्धवट सोडले आणि गुन्हेगारीच्या मार्गाला लागला. टोळीच्या मदतीने महामार्गावर वाहने अडवून चालकांना लुटण्याचे गुन्हे तो करीत होता.

मात्र आता पोलिसांनी सागर भांड टोळीविरूद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये राहुरी येथील एकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले होते. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा सागर भांड टोळीने केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी भांडच्या टोळीला अटक केली होती. पोलिसांनी भांडच्या टोळीविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची कुंडली काढली.

पुन्हा पुन्हा गुन्हे करण्याची या टोळीची पद्धत लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राहुरी पोलिसांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) प्रस्ताव तयार केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यामार्फत तो नाशिकला पाठविण्यात आला. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भांडच्या टोळीविरूद्ध मोक्का कायद्यातील कलमे लावण्यात आली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!