तपोवन रोडच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांना निवेदन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- शहरात मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत तपोवन रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या निकृष्ट कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन सदर रस्त्याचे काम पुन्हा चांगल्या पध्दतीने करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना देण्यात आले.

यावेळी इंजि. भाग्येश शिंदे, संतोष पवार, विनोदसिंग परदेशी, अजित धस, प्रकाश बेरड, पप्पू येवले, गुरुनाथ क्षेत्रे, चंदू टाके, ऋषी ढवण, रोहन ढवण, अभिषेक गवळी, प्रकाश भोडवे, योगेश्‍वर गागरे, सिध्दार्थ सांगळे, अशोक शिंदे, बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. शहरातील तपोवन रोडचे मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत काम सुरू करण्यात आले होते. सदर कामपुर्तीनंतर कंत्राटदार मार्फत पाच वर्ष देखभाल व दुरुस्ती याची हमी होती.

परंतु या रस्त्याचे काम होऊन अवघे आठ दिवस झाल्यानंतर रस्ता ठिकठिकाणी पूर्णपणे उखडले. त्यानंतर पुन्हा खडी टाकून पॅचिंगचे काम करण्यात आले. मात्र सदर रस्त्याची अवस्था पुन्हा खड्डेमय झाली आहे. कोट्यावधी रुपयाचे काम होऊन देखील सर्व पैसे पाण्यात गेले. नागरिकांना नव्याने झालेल्या रस्त्यावर खड्डयांचा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेक तक्रारी करुन देखील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

या निकृष्ट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या निकृष्ट रस्त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, नागरिकांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास सुरु झाला आहे. तर धुळीमुळे श्‍वसनाचे आजार जडत आहे.

सदर रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन पुन्हा दर्जेदार पध्दतीने काम न केल्यास सदरील रस्ता जेसीबीने खोदून शेवटचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment