मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद यात्रा सुरू आहे. या दरम्यान अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलेल्या वक्तव्याचा ब्राम्हण समाजाकडून निषेध नोंदवला जात आहे.
ब्राम्हण समाजाकडून अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. याच मुद्यावरून चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नाचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. ते म्हणाले, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेत कोल्हापूर (Kolhapur) येथे पत्रकारांशी बोलताना थापा मारण्याचा उच्चांक केला.
काँग्रेस (Congress) पक्षाने कधीच नाव बदलले नाही म्हणून जयंत पाटील अभिमानाने सांगतात. त्यांनी हे सांगावे की, शरद पवार यांनी 1978 मध्ये काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून येऊन जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवले तो काँग्रेस पक्ष खरा होता की, इंदिरा गांधी यांचा काँग्रेस पक्ष खरा होता?
शरद पवार यांचा काँग्रेस एस हा मूळ काँग्रेस पक्ष होता की, काँग्रेस आय हा मूळ पक्ष होता? शरद पवारांनी नंतर काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला त्यावेळी कधीही नाव न बदलणारा मूळ काँग्रेस पक्ष कोणता होता?
1999 साली काँग्रेस पक्षाने शरद पवारांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याला अधिकृत काँग्रेस म्हणायचे का? शरद पवारांनी ज्या सोनिया गांधींना विदेशी म्हणून विरोध केला आणि नंतर त्यांच्याच नेतृत्वाखालील आघाडीत मंत्री झाले त्यांचा काँग्रेस पक्ष खरा का? असे अनेक प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण नेतृत्व करता आणि इंडियन नॅशनल काँग्रेस नावाचा आणखी एक काँग्रेस पक्ष आहे.
नक्की कोणत्या काँग्रेसने नाव बदलले नाही म्हणून सांगता, हे सुद्धा जयंतरावांनी स्पष्ट करावे असा खोचक टोला देखील त्यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.
जयंतराव थापा मारून दिवस ढकलणे बंद करा❗@Jayant_R_Patil #Maharashtra #BJP #NCP pic.twitter.com/XZerOdzAUV
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) April 22, 2022
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, थापा मारण्याचा उच्चांक करताना जयंतराव म्हणाले की, भाजपाचा जन्म होऊन 50 वर्षेही झाली नाहीत. त्याचवेळी त्यांनी सांगितले की, भाजपाने पन्नास वर्षात तीन वेळा नाव बदलले. काय बोलतो हे त्यांनाच समजत नाही.
जनसंघाची स्थापना 1951 साली म्हणजे सत्तर वर्षांपूर्वी झाली. 1975 साली देशात आणीबाणी लागू करून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली त्यावेळी जनसंघाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला व त्याचाच एक भाग म्हणून आपला पक्ष जनता पक्षात विलीन केला.
नंतर जनसंघाचे नेते बाहेर पडल्यामुळे 1980 साली भाजपाची स्थापना झाली. आणीबाणीच्या विरोधात लढा देताना भाजपाने त्यावेळची परिस्थिती म्हणून जे निर्णय घेतले त्यामुळे पक्षाच्या नावात बदल झाला. पण आम्ही आमच्या निष्ठा बदलल्या नाहीत आणि हिंदुत्वाचा विचारही सोडला नाही. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.