एसटी संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसणार… शाळा सुरु मात्र जायचं कस?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे मोठ्या अडचणी देखील निर्माण झाल्या आहेत.

यातच आता याचा फटका विद्यार्थ्यांना देखील बसतो आहे.आज, सोमवारपासून राज्यातील बहुतांश शाळा सुरू होत आहेत. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांसमोर शाळेत पोहोचण्याचा प्रश्न आहे.

राज्यातील बहुतांशी शाळांतील वर्ग आज सोमवार(२२ नोव्हेंबर) पासून नियमित सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दुसऱ्या गावातील शाळेत जावे लागते.

एसटी बस ही या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे प्रमुख साधन आहे. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या तरी शाळेपर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे.

सध्या ग्रामीण भागांत वाहतुकीसाठी खासगीचाच पर्याय आहे. मात्र खासगी वाहतूकदारांकडून मनमानी कारभार चालविला जातो आहे. यामुळे प्रवाशी देखील वैतागले आहे.

यातच अनेक विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासासाठी २० ते २५ रुपये खर्च करणेही शक्य नसते. एसटी प्रवासासाठी विद्यार्थ्यांना सवलत मिळते, खासगी वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते.

पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालूून प्रवास करावा लागतो. शिवाय सध्या प्रवासासाठी अधिक भाडे घेऊन खासगी वाहनचालक प्रवाशांना लूटत आहेत. यामुळे संप केव्हा मिटणार आता याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे देखील लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe