अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 maharashtra news : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंबंधी कडक भूमिका घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसही सरसावले आहेत.
याचे पहिले पाऊल नाशिक शहरात उचलल्याचे दिसून आले. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी यासंबंधी एक आदेश काढला आहे.
सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी आवश्यक असून त्यांनी ती ३ मे पर्यंत घ्यावी, असा आदेश दिला आहे. तर ३ मे नंतर होणारे आंदोलन लक्षात घेता मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई करण्यात आली आहे.
आयुक्तांच्या या आदेशावर मनसे आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून काय भूमिका घेतली जाते, हे लवकरच कळेल. आता राज्यातील अन्य ठिकाणी पोलिस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निकालाच्या आधारे राज ठाकरे यांनी ही मागणी केली आहे, त्यामध्ये भोंगे काढून टाकण्याचा उल्लेख नाही.
ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यातील नियमांचे पालन करून भोंगे लावण्याचे निर्देश आहेत. त्यामुळेच नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्याची परवानगी घेण्यास सांगण्यात आले आहे.
विना परवाना भोंगे काढले जातील. परवानगी घेऊन नियमानुसार आवाजाची पातळी ठेवून भोंगे सुरू ठेवता येणार आहेत, हे यावरून स्पष्ट होते.
विशेष म्हणजे अजान सुरू झाल्यावर भोंगे लावण्याची घोषणा ठाकरे यांनी केली आहे. त्यासंबंधीही प्रतिबंधात्मक आदेश नाशिक पोलिसांनी जारी केला आहे.
त्यानुसार कुठल्याही मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई करण्यात आली आहे. जानच्या वेळी हनुमान चालीसा लावता येणार नाही.
मशिदीत अजान होण्याच्या १५ मिनिटं आधी हनुमान चालीसा लावता येईल, असेही आदेशाच म्हटले आहे. केवळ मशिदीच नव्हे तर सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असल्याने त्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.