अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे.
कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत. त्यांना संरक्षण मिळावे, तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत याची दक्षता शासनातर्फे घेतली जात आहे.
याअनुषंगाने सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाने निर्गमीत केलेल्या शासन निर्णयान्वये अहमदनगर जिल्ह्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी टास्क फोर्समधील सदस्यांची बैठक घेऊन कामकाजासंदर्भात आढावा घेतला. नागरिकांनीही अशा बालकांची माहिती असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर तसेच जिल्हास्तरीय यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी चाईल्ड लाईन हेल्पलाईन नंबर १०९८, सेव दी चिल्ड्रेन्स ७४०००१५५१८ आणि ८३०८९९२२२२ तसेच जिल्हास्तरीय यंत्रणा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, अहमदनगर ०२४१ २४३११७१,
वैभव देशमुख (जिल्हा बालसंरक्षण अधिकारी ) ९९२१११२९११, हनीफ शेख (अध्यक्ष, बाल कल्याण समिती) ९०११०२०१७७ आणि सर्जेराव शिरसाठ (संरक्षण अधिकारी, संस्थाबाह्य काळजी) ९९२१३०७३१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीस महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या सदस्य सचिव रेवती देशपांडे,
जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.जी. पाटील. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख तसेच इतर यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम