मुंबईच्या आझाद मैदानातील शिक्षकांचे आंदोलन पेटले ! आत्मदहनासाठी निघालेल्या शिक्षकांना वेळीच अटक केल्याने अनर्थ टळला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  राज्यातील सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदावर आणि तुकड्यांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मर्चा­यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मागील सहा दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानात जुनी पेन्शन फोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला.(Teachers’ agitation erupt)

सामुदायिक आत्मदहनसाठी सोमवारी (दि.२७ डिसेंबर) विधानभवनाकडे आंदोलकांनी कूच केली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवून संघटनेच्या प्रमुख नेत्यांसह आंदोलक शिक्षकांना अटक केली. यावेळी आंदोलकांमध्ये उद्रेक होऊन पोलिसांसह बाचाबाची झाली.

कोरोना काळात तसेच पेन्शन नसल्यामुळे भविष्याच्या चिंतेतून बहुसंख्य शिक्षक मयत झाले आहेत. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी तसेच मयत शिक्षकांच्या पाल्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आझाद मैदानावर दि.२३डिसेंबर पासून महाविश्­वास धरणे आंदोलन सुरू आहे.

आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शिक्षकांनी मुंडन करुन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवला होता. तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

सोमवारी आंदोलक मोर्चाने विधानभवनाकडे सामुदायिक आत्मदहनासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना अटक केल्याने पुढील अनर्थ टळला. एकच मिशन जुनी पेन्शन या घोषणांनी परिसर दणाणले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe